Ladki bahan Yojana new update : एकाच कुटुंबातील तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अनेक युक्त्या करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता या लाभार्थी महिलांचा योजनेतून पत्ता कट होणार आहे. अशा महिलांचे नावे योजनेतून काढून टाकण्यासाठी अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. शासनाकडून जालना जिल्ह्यातील ७० हजार लाभार्थी महिलांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत..
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी फारसे निकष न तपासता अर्ज मंजूर केले गेले. त्याची फलनिष्पत्ती महायुतीला मिळाली अन् पुन्हा भाजप-शिवसेना-राकाँचे सरकार सत्तेवर आले असल्याची चर्चा होत आहे. सध्या या योजनेचा आर्थिक भार राज्य सरकारवर पडत असल्याचेही देखील सांगितले जात आहे. यानुसार, राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या याद्या तपासण्याचे काम युद्धपातळीवर मुंबई येथून केले जात आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या नावांची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्यांना अपात्र केले जात आहे. सध्या जालना जिल्ह्यात योजनेचा लाभघेणाऱ्या एकूण लाभार्थी महिलांची संख्या ४ लाख ६४ हजार ६९४ एवढी आहे.
योजनेसाठी निकष-अटी?
योजनेत अर्ज दाखल करतांना काही निकष-अटी ठरवून देण्यात आल्या होत्या. यात अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, महिलेचे वय २१ ते ६५ वर्षाच्या दरम्यान असावे, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच, कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते, अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यासह इतर निकष ठरवून देण्यात आले होते.
वरिष्ठ कार्यालयाकडून यादी
Ladki bahan Yojana new update मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेत दाखल करण्यात आलेल्या सर्व अर्जाची छाननी प्रक्रिया मुंबई येथील कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे. यानुसार, जालना जिल्ह्यातील ७० हजार २०० अर्जाच्या बाबतीत एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्याचा संशय आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका घरी येऊन पडताळणी करणार आहेत.